सात जन्मांच्या आणाभाका… अन् पाचव्याच दिवशी पोबारा! ५ लाख घेऊन नववधू फरार; जेवणात गुंगीचं औषध टाकल्याचा आरोप


श्रीगोंदा : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात लग्नाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या कथित रॅकेटकडे लक्ष वेधणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभराची साथ मिळेल या विश्वासाने दोन सख्ख्या भावांनी छत्तीसगडमधील दोन तरुणींशी विवाह केला. मात्र, विवाहानंतर अवघ्या पाच दिवसांतच दोन्ही नववधू बेपत्ता झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या विवाहासाठी एजंटला तब्बल पाच लाख रुपये दिल्याचा दावा पीडित कुटुंबाने केला असून, नववधूंनी जेवणात गुंगीचं औषध मिसळून पलायन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील चोराची वाडी येथील हे दोन्ही भाऊ मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अनेक प्रयत्न करूनही विवाह जमत नसल्याने त्यांनी नांदेडमधील एका एजंटशी संपर्क साधला. एजंटने छत्तीसगडमधील दोन मुलींसोबत विवाह लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी पाच लाख रुपयांचा व्यवहार निश्चित झाला. सुरुवातीला एक लाख रुपये ऑनलाइन देण्यात आले, तर २३ मे रोजी साध्या वैदिक पद्धतीने विवाह पार पडल्यानंतर उर्वरित चार लाख रुपये रोख स्वरूपात एजंटच्या स्वाधीन करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

विवाहानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू असल्याने कुटुंबीयांनाही कोणताही संशय आला नाही. नववधू घरातील सदस्यांशी आपुलकीने वागत असल्याने संसार सुरळीत सुरू होईल, अशी आशा सर्वांनाच होती. मात्र, पाचव्या दिवशी रात्रीच्या जेवणानंतर घरातील सर्व सदस्यांना असामान्य गुंगी आल्याचा दावा करण्यात आला आहे. सकाळी जाग आल्यानंतर दोन्ही नववधू घरातून गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांचा तसेच विवाह जुळवून देणाऱ्या एजंटचा संपर्क होऊ शकला नसल्याने ही पूर्वनियोजित फसवणूक असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.

घटनेनंतर पीडित कुटुंबाने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली. वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित एजंट आणि फरार महिलांचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या घटनेची प्राथमिक माहिती मिळाल्याची पुष्टी केली आहे. दोन भावांची लग्नाच्या आमिषाने फसवणूक झाल्याची बाब समोर आली असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. आवश्यक पुरावे तपासून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल. या प्रकारामागे संघटित टोळी कार्यरत आहे का, याचाही तपास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेमुळे लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची उकळपट्टी करणाऱ्या कथित टोळ्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा व्यवहारांपूर्वी संबंधितांची पडताळणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!