शेतकरी कर्जमाफीला पुन्हा नवा मुहूर्त! दत्तात्रय भरणेंनी सांगितली तारीख; कर्जमुक्तीला विलंब का?


मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतरही प्रत्यक्ष लाभ मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे. यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी केली होती. मात्र, कर्जमाफीची अंमलबजावणी कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी 30 जूनपर्यंत कर्जमाफी देण्याचे नियोजन होते. मात्र, राज्यपालांच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे कारण देत 5 जुलैची तारीख पुढे आली. मात्र, ही मुदतही उलटून गेली. आता जुलै महिना अर्ध्यावर आला असून कर्जमाफीसाठी वारंवार बदलणाऱ्या तारखांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंढरीच्या वारीदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जुलै महिना संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीसाठी 20 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. तसेच कर्जमाफीच्या निकषांमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आल्याचेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आता सरकार दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण करते का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कर्जमाफीला होणाऱ्या विलंबामागे नवीन निकष हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणि माहिती केंद्र सरकारकडून मागवण्यात आली आहे. ही माहिती मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्याची भूमिका सरकारने घेतली आहे.

सरकारच्या नव्या निकषांनुसार आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. केवळ गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा फायदा देण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेत निकष बदलल्यानंतर लाभार्थींची छाननी करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला होता. त्याचप्रमाणे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरू शकते, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

या सर्व दावे-प्रतिदाव्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय रखडल्याचे चित्र आहे. ऑगस्टपूर्वी कर्जमाफी न दिल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आता जुलैअखेरपर्यंत कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्षात येतो का, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!