तुकाराम मुंढेंचा नवा मोर्चा! शाळांच्या उपाहारगृहांची होणार तपासणी; मध्यान्ह भोजन योजनेवर FDAची करडी नजर

मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) कारभार हाती घेतल्यानंतर भेसळखोरांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. दूध भेसळ, मिठाई आणि इतर अन्न पदार्थांमधील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर आता FDAने आपला मोर्चा शाळांच्या उपाहारगृहांकडे वळवला आहे.

राज्यभरात झालेल्या कारवायांमुळे अन्न भेसळ करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक मोठी नावे समोर आली असून हॉटेल चालक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही प्रशासनाची नजर आहे.
आता शाळांमधील कँटीन तसेच मध्यान्ह भोजन योजनेतील अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेवणात आळ्या, खराब अन्न किंवा स्वच्छतेअभावी समस्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा FDAने दिला आहे.

मुंबईतील खासगी शाळांमधील उपाहारगृहे आणि मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या किचन शेडची तपासणी करण्यासाठी FDAने मोहीम सुरू केली आहे. यासाठी मुख्याध्यापक, बचत गट चालक आणि शिक्षण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.

अन्न सुरक्षा मानके अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आली असून, शाळांमध्ये स्वच्छता, सुरक्षित अन्न आणि विद्यार्थ्यांना सकस आहार मिळणे आवश्यक असल्याचे FDAने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शाळा परिसरातील ‘स्टिंग’ विक्रीवरही नजर
दरम्यान, शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘स्टिंग’ या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. या पेयामध्ये कॅफेनचे प्रमाण जास्त असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
बंदी असूनही काही ठिकाणी शाळांच्या परिसरात अशा पेयांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांवरही FDAकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.