20 वर्षांचा संघर्ष, 127 साक्षीदार… तरीही पवनराजे निंबाळकर प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; ओमराजेंना मोठा धक्का


धाराशिव : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात तब्बल दोन दशकांनंतर निकाल जाहीर झाला आहे. या प्रकरणात माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण आठ आरोपींना कोर्टाने निर्दोष मुक्तता दिली आहे. सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची सुटका करण्यात आली असून, माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नसल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

3 जून 2006 रोजी मुंबईहून धाराशिवकडे जात असताना पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची कळंबोली परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली होती. तपासादरम्यान सीबीआयने एकूण 127 साक्षीदार तपासले आणि अनेक महत्त्वाचे पुरावे सादर केले, तरीही न्यायालयाने पुरावे अपुरे असल्याचे स्पष्ट केले.

कोर्टाने निकाल वाचनादरम्यान तपासातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले. माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांच्या जबाबात मोठ्या तफावती आढळल्याचे कोर्टाने नमूद केले. तसेच दोन वेगवेगळ्या कबुलीजबाबांमध्ये बदल असल्याचेही निदर्शनास आले. चार्जशीट दाखल होण्याच्या काही दिवस आधी माफीच्या साक्षीदाराचा पुन्हा जबाब नोंदवण्यात आला होता, मात्र त्यावर न्यायाधीशांची स्वाक्षरी नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. या त्रुटींमुळे सीबीआयच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

या प्रकरणात पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलाश यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे यांचा समावेश होता. कोर्टाने सर्व आरोपी निर्दोष ठरवत त्यांची मुक्तता केली आहे.

निकालानंतर न्यायालय परिसरात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, हा निर्णय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!