अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक; महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ


मुंबई : राज्यातील 17 विधान परिषद जागांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरलेला नसल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जळगावसह राज्यातील कोणत्याही विधान परिषद जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सांगताना पाटील म्हणाले की, जागावाटपाचे सर्व अधिकार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत.

जलजीवन मिशनच्या निधीसंदर्भात दिल्ली दौऱ्यावर गेलो होतो, मात्र महायुतीतील जागावाटपाबाबत झालेल्या बैठकींना मी उपस्थित नव्हतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये अद्यापही रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. जागावाटपाचा पेच कायम राहिल्यास मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता नाकारता येत नसल्याचे संकेतही पाटील यांनी दिले. आमचे पहिले प्राधान्य महायुतीच असेल, मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

त्यामुळे जळगाव विधान परिषद मतदारसंघाबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील आणि त्यांच्या पुत्राच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावले. मी गेली 45 वर्षे शिवसेनेत आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा निराधार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच आमदार संतोष बांगर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, श्रीकांत शिंदे हे पक्षाचे नेते असून त्यांनी कोणाला काय संकेत द्यावेत हा त्यांचा अधिकार असल्याचे पाटील यांनी म्हटले. यामुळे विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीतील जागावाटपाचा सस्पेन्स आणखी गडद झाला असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!