उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यावर धनखड यांचा मोठा गौप्यस्फोट; ”प्रकृती अस्वास्थामुळे राजीनामा दिला नाही तर…..”

मुंबई : देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र यावर त्यांनी पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट केला आहे.आपण आजारी असल्यामुळे राजीनामा दिलाच नव्हता असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. त्यांच्या या नव्या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.

पुढे बोलताना धनखड म्हणाले, जेव्हा मी उपराष्ट्रपतीपद सोडले, तेव्हा मी कधीही आजारी असल्याचा उल्लेख केला नव्हता. मी फक्त आरोग्याला महत्त्व देण्याबाबत बोललो होतो. पहिलं सुख हे निरोगी असण्यात आहे, त्यामुळे मी आरोग्याशी कधीही तडजोड केली नाही.त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जगदीप धनखड आजारी नव्हते मग संवैधानिक पदावरून पायउतार होण्याइतपत मोठे कारण काय होते? हा प्रश्न आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगला आहे
तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलेल्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे होता? उपराष्ट्रपती असताना त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे सरकारशी त्यांचे मतभेद झाले होते का? हा कळीचा मुद्दा आता समोर आला आहे. यावरून आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

याआधी धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यावेळी प्रकृती बरी नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. मात्र, आता स्वतः धनखड यांनीच या कारणावरुन स्पष्टीकरण दिल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.