लोणी काळभोरला माती टाकण्याच्या वादातून दोन कुटुंबामध्ये हाणामारी; माजी उपसरपंचासह ६ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल


लोणी काळभोर : सामाईक मोकळ्या जागेत माती टाकण्याच्या किरकोळ कारणावरून जवळच्या नातेवाईक कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीपर्यंत पोहोचले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून माजी उपसरपंचासह सहा जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

सदर घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पांढरी रोड परिसरात घडली आहे. या प्रकरणात महिलांना मारहाण, दगडाने हल्ला, दागिने तुटणे व ठार मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.माजी उपसरपंच गणेश कांबळे यांच्या पत्नी सिम्पल गणेश कांबळे (वय ३२, रा. पांढरी रोड, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मिलिंद भास्कर कांबळे व करिष्मा मिलिंद कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर करिष्मा मिलिंद कांबळे (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माजी उपसरपंच गणेश तात्याराम कांबळे, सुनंदा तात्याराम कांबळे, सिम्पल गणेश कांबळे आणि मोनू गौतम कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिष्मा कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या घरी असताना त्यांची चुलत सासू सुनंदा कांबळे व सिम्पल कांबळे या त्यांच्या घरी आल्या. सामाईक जागेत माती टाकण्याच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. हा वाद लगेचच शिवीगाळ आणि मारहाणीपर्यंत गेला. करिष्मा कांबळे यांनी विरोध केल्यावर त्यांना हाताने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हा आरडाओरडा ऐकून माजी उपसरपंच गणेश कांबळे घटनास्थळी आले. त्यांनीही शिवीगाळ करत दादागिरी केली. करिष्मा कांबळे घरात गेल्यानंतरही त्यांच्या मागे घरात घुसून त्यांना बाहेर ओढले. आणि दगडाने मारहाण केली. या झटापटीत करिष्मा कांबळे यांच्या गळ्यातील सुमारे दहा ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र तुटून काही भाग गहाळ झाला. त्याचवेळी मोनू कांबळे यांनी ठार मारण्याची धमकी दिली आहे.

तर सिम्पल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे व मिलिंद कांबळे आणी करिष्मा कांबळे यांच्यामध्ये शेजारील बांधकामातून निघालेली माती सामाईक मोकळ्या जागेत टाकण्याच्या कारणावरून आधीपासून वाद सुरू होता. तेथे पुन्हा माती टाकल्याने सुनंदा कांबळे यांनी मिलिंद कांबळे यांना जाब विचारला. त्यावेळी मिलिंद यांनी शिवीगाळ केली व करिष्मा कांबळे यांनी सुनंदा कांबळे यांना मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून सिम्पल कांबळे तेथे गेल्या. तेव्हा त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली.त्यानंतर मिलिंद कांबळे यांनी त्यांना पकडून ठेवले आणि करिष्मा कांबळे यांनी दोघींना मारहाण व धक्काबुक्की केली.

या झटापटीदरम्यान सिम्पल कांबळे यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोन्याची चैन तुटून गहाळ झाली आहे. गोंधळ वाढत असताना गणेश कांबळे तेथे आले असता मिलिंद कांबळे यांनी जमिनीवरील दगड उचलून त्यांच्यावर हल्ला केला. परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करून दोन्ही कुटुंबामधील वाद थांबवला.

दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल केल्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एकूण सहा जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!