अजित पवार यांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भावूक, शिवनेरीवर म्हणाले, गेल्यावर्षी अजितदादा…

पुणे : आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९६ वी जयंती आहे. राज्यभरात मोठा उत्साह लोकांमध्ये बघायला मिळतोय. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रात्रीपासूनच शिवनेरी गडावर भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन गडावर करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शिवनेरी गडावर पोहोचले. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच शिवनेरी गडावर भाषण केले.
शिवनेरी गडावर गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांना अजित पवार यांची आठवण आली. भाषणासाठी उभे राहताच एकनाथ शिंदे यांनी भावूक होत म्हटले की, गेल्या वर्षी याठिकाणी दादा आपल्यासोबत होते.

आपल्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आमच्यासोबत अजित दादा होते… त्यांना सुरूवातीलाच आपण श्रद्धांजली अर्पित केली. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. यावेळी एकनाथ शिंदे भावूक झाले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आजचा हा दिवस आपल्या तमाम शिवभक्तांसाठी आनंदाचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो.
यशवंत, किर्तीवंत, सामर्थवंत, पुण्यवंत असे आपले जानते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्म दिवस आहे. हिंदुत्वाचा ओंकार म्हणजे शिवछत्रपती, लोकशाहीचा अविष्कार म्हणजे शिवछत्रपती, शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे युगपुरूष, आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती..
मोदी शिवरायांचे निस्सीम भक्त आहेत. शिवरायांच्या आदर्शाने आणि प्रेणनेने आपण मार्गक्रमण करतोय. शिवराय काळाच्या पुढे विचाऱ करणारे स्वराज्याचे निर्माते होते. आदर्श राजा कसा आसावा याचा वस्तुपाठ महाराजांनी आखून दिलाय. आपलं सरकारही तसंच काम करतंय. शिवरायांचा एक एक गुण अंगिकारणं गरजेचं आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.