काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बॉम्ब फोडला ; सत्ताधारी 21 आमदारांना डिफेंडर कार दिवाळी भेट दिल्याचा आरोप, कोण आहेत आमदार?

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तोंडावर असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐन दिवाळीत मोठा बॉम्ब फोडला आहे.त्यांनी सत्ताधारी 21 आमदारांना ठेकेदाराने डिफेंडर कारची दिवाळी भेट दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ते 21 आमदार कोण आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी 21 आमदारांना एका ठेकेदाराने डिफेंडर कार भेट दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. आता हे 21 आमदार कोण आहेत, तो गिफ्ट देणारा ठेकेदार कोण आहे असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. याचे उत्तर लवकरच राज्याला मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काही दिवसात आरोपांचा मोठा धुराळा उडण्याची शक्यता आहे. एक डिफेंडर कार बुलढाण्यात आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. तर कदाचित 22 कार ही भेट दिल्या असतील असा चिमटा काढला. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी थेट कुणाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख कुणाकडे होता, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर मत चोरीबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चित्रपट दाखवणार आहे. उद्या संध्याकाळी प्रेस क्लबमध्ये मतचोरीचा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुद्धा उपस्थित असतील. या चित्रपटानंतर चर्चा सत्र घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी काँग्रेस या मुद्दावर आक्रमक होताना दिसत आहे.

