मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती…

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. तर, दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.
आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या सात मागण्यांपैकी उज्जवल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी मान्य करण्यात आली आहे. उज्जवल निकम यांच्या नियुक्तीच, हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे.

उज्ज्वल निकम यांनी १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेपासून ते मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे खटले यशस्वीरित्या लढवले आहेत. मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.
आरोग्य पथकाकडून धनंजय देशमुख व संतोष देशमुख यांच्या आई शारदबाई देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. धनंजय देशमुख यांनी कालपासून पाणीही घेतलेलं नाही. धनंजय देशमुख यांचा रक्तदाब सामान्य असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे धनंजय देशमुख यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आले आहेत. मागण्या मान्य होत आहेत आंदोलन स्थगित करा हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा निरोप वैभव पाटलांनी धनंजय देशमुख यांना दिला.