‘यशवंत’ कारखान्याच्या जमिन विक्रीचा ठराव हाणून पाडणार ! कारखान्याचा संचालक मंडळाचा अभ्यास कमी – प्रा.के.डी. कांचन

उरुळी कांचन : जिल्हातील भिमा -पाटस, कर्मयोगी, छत्रपती सहकारी साखर कारखाने कर्जाच्या बोजातून चालू झाले आहे. त्याचप्रमाणे यशवंत कारखान्याचे संचालक मंडळ निर्णय का घेत नाही कर्जाचे नियोजन का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित करीत यशवंतच्या संचालक मंडळाचा जमीन विक्री करुन कारखाना चालू करणे हा सहकारात अभ्यास कमी असल्याचे लक्षण असून कारखान्याला भविष्यात ऊस उत्पादन मोठे असून संचालक मंडळाने इतर मार्गाने चालू करणे अपेक्षित असताना संचालक मंडळाने मनमानी कारभाराने विक्रीचा विषय घेतला आहे.आम्ही सभासद म्हणून जमिन विक्रीचा डाव हाणून पाडू असा इशारा कारखान्याचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते प्रा.के.डी.कांचन यांनी दिला आहे.

थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमिनीची विक्री पुणे बाजार समितीला करण्यासाठी संचालक मंडळाने आयोजित केलेल्या (दि.२६) सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बचाव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रा.के.डी.कांचन यांनी वरील इशारा दिला आहे.पत्रकार परिषदेस बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, सुरेश कामठे, अजिंक्य कांचन, अलंकार कांचन ,वाडे बोल्हाईचे माजी माजी सरपंच दिपक गावडे, नायगावचे माजी सरपंच राजेंद्र चौधरी, कोरेगाव मूळ चे माजी उपसरपंच लोकेश कानकाटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय काळभोर, पुणे फूलबाजार समितीचे माजी अध्यक्ष एम.एस. चौधरी, सागर गोते, निलेश काळभोर, चंद्रकांत वारघडे, उपस्थित होते.

के.डी.कांचन म्हणाले की, कारखाना सुरू झाल्यानंतर कारखान्याकडे ५० एकर जमीन असताना कारखान्याने २५० एकर अधिकची जमीन परिसरातील शेतकऱ्यांच्या सहकार्यातून खरेदी केली आहे.या जमीनीवर कारखान्याचा बेणे प्लॉट ,प्रेसमोड प्लॉट अशा कारणासाठी खरेदी केली आहे. मात्र ती जमीन विक्री करणे कारखान्याचे नुकसान करणे आहे. त्यापेक्षा जिल्ह्यातील इतर कारखाने छत्रपती, कर्मयोगी, भिमा पाटस कारखान्याप्रमाणे कर्जाचा काढून चालू करणे व्यवहार्य आहे.त्यामुळे कारखान्याची जमीन विक्रीचा विषय हाणून पाडणार असल्याचे ते म्हणाले.
राजेंद्र चौधरी म्हणाले, कारखान्याने जमिन विक्रीचा मुद्दा सभासदांपुढे बेकायदेशीर मांडला आहे. सभासदांना जमीनीचे प्रचलीत बाजार, बाजार मूल्यांकन , दर सभेपूर्वी देणे आवश्यक होते पण तसे झाले नाही. कारखान्याची ऑडीट रिपोर्ट नुसार ११०कोटीकर्ज व देणी असतील तर संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्यासाठी ३०० कोटींची आवश्यकता कशासाठी सांगितली आहे हा खरा प्रश्न आहे. जमिन विक्रीतून इतर पैसा कशासाठी उभा केला जातोय असे ते म्हणाले.
अजिंक्य कांचन म्हणाले,संचालक मंडळाने जमीन विक्री हाच एकमेव पर्याय सभासदांपुढे लादला आहे. वास्तविक संस्था शेजारच्या भीमा – पाटस प्रमाणे भाडेतत्वावर देऊ केला असता , घोडगंगा कारखान्याप्रमाणे कर्जाचा विचार करणे अपेक्षित होते, सभासदांशी चर्चा करुन अन्य पर्याय निवडणे आवश्यक होते मात्र तसे न करता एक संस्था वाचविण्यासाठी दुसरी संस्था बुडविणे असा प्रकार केला असल्याचे ते म्हणाले.
सुरेश कामठे म्हणाले, कारखाना सुरू करण्यासाठी सत्ताधारी संचालक मंडळाने एक इंच जमीन विक्री न करता कारखाना सुरू करतो हा सभासदांशी विश्वासघात आहे. तुम्ही सभासदांना निवडणुकीत ब्लू प्रिंट जाहीर केली होती ती कुठे गेली आणि ब्लू प्रिंटचे परिणाम तालुक्याला दाखविले असा विरोधी पॅनेल प्रमुखांना सवाल उपस्थित केला आहे.