वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची, अपघातात ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू, घटनेने हळहळ..

Accident : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन जणांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे, तर अन्य एक जण गंभीर जखमी झल्याची घटना समोर आली आहे.

वर्धा-नागपूर रस्त्यावरील सेलू बायपास परिसरात त्यांच्या कारला अपघात झाला. भरधाव कार पलटी झाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
शुभम मेश्राम, सुशील मस्के आणि समीर सुटे अशी मृत पावलेल्या तीन मित्रांची नावे आहेत. तर धनराज धाबर्डे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी धनराजवर नागपूर (Nagpur) येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील रहिवासी असलेले चारही जण गुरुवारी वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी नागपूरला गेले होते. पार्टीनंतर रात्री उशिरा ते वर्ध्याच्या दिशेने येत होते. दरम्यान, भरधाव वेगाने जात असताना सेलू बायपास रोडवर त्यांच्या कारला अपघात झाला. कार पाच ते सहा वेळा पलटी झाली.

या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. धनराज धाबर्डे याला सुरुवातीला सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल केले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरला हलवण्यात आले आहे.