Indapur : इंदापूरमध्ये पुन्हा हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात तिसऱ्यांदा दत्तामामा भरणे मैदानात, अपक्षाचा फायदा पाटलांनाच…

Indapur : महायुतीतील भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काल शिवसेना शिंदे गटानं देखील ४५ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ३८ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

यामध्ये बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये राज्यात चर्चेत असणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाने विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना संधी दिली आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये तिसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तामामा भरणे असा समान रंगणार आहे.


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मोठं इनकमिंग सुरु आहे. अशातच काही दिवसापूर्वी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला होता. हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. तर तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट मिळाल्याचे दिसून येत आहे.
कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांनी हाती घ्यावं, असं वक्तव्य केलं होतं. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबत सुतोवाच केले आहे.
त्यामुळे एकप्रकारे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तामामा भरणे असाच सामना रंगण्याची शक्यता आहे.
