एका बैठकीत चार मोठे निर्णय; सावंतवाडी स्थानकाचं नामांतर, मंदिराला जमीन, नागपूर प्रकल्पाला दिलासा

मुंबई : राज्यातील राजकारण तापलेले असतानाच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने तडकाफडकी घेतलेल्या चार मोठ्या निर्णयांनी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. कोकणातील सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या नामांतरापासून ते डोंबिवलीतील मंदिराला जमीन देण्यापर्यंत आणि नागपूर बाह्य वळण रस्ता प्रकल्पाला मोठा दिलासा देण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आले.

कोकणातील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला आता कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते मधु दंडवते यांचे नाव देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाने ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ या नावाला मंजुरी दिली असून यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. या निर्णयामुळे कोकणातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, डोंबिवली औद्योगिक परिसरातील सोनारपाडा येथे असलेल्या पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टलाही मोठा दिलासा मिळाला आहे. मौजे सागाव परिसरातील सुमारे ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात मंदिर ट्रस्टला देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अनेक वर्षांपासून रखडलेला विषय अखेर मार्गी लागल्याने भाविकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

नागपूरमधील महत्त्वाच्या बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठीही सरकारने मोठा निर्णय घेतला. हिंगणा तालुक्यातील गोदणी आणि लाडगाव परिसरातील खासगी जमीन थेट खरेदी प्रक्रियेद्वारे संपादित करण्यात येणार असून या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

याशिवाय राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. बदल्यांचे नियमन आणि प्रशासकीय कामकाजातील विलंब टाळण्यासाठी असलेल्या अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीतील निर्णयांमुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.