3 चिमुकल्यांना रस्त्यावर सोडलं अन् झाली फरार महिला; डोंबिवली हादरलं, तपासात उघड संतापजनक गोष्ट


डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीतून माणुसकीला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने स्वतःच्या तीन लहान मुलांना रस्त्यावर सोडून पळ काढल्याचा प्रकार उघडकीस आला असून ही महिला सध्या बेपत्ता आहे. सोमवारी सकाळी डोंबिवली पश्चिमेत हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला तिच्या तीन चिमुकल्यांसह रस्त्याने जात असताना तिने तेथील एका वृद्ध व्यक्तीशी संपर्क साधला. “मी मुलांसाठी खाऊ घेऊन येते, तोपर्यंत कृपया यांच्याकडे लक्ष द्या,” असे सांगून ती तेथून निघून गेली. मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही ती परत न आल्याने संशय निर्माण झाला.

यानंतर त्या वृद्धाने परिसरातील नागरिकांना माहिती दिली. त्याचवेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या जयश्री यादव यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखत तातडीने मदत केली. किरण मोंडकर आणि राजश्री कराळे यांच्या सहकार्याने तिन्ही मुलांना सुरक्षितपणे विष्णूनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

या मुलांमध्ये सुमारे चार वर्षांचा एक मुलगा आणि अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींचा समावेश आहे. लहान वयामुळे मुलांना स्वतःबद्दल किंवा घराबद्दल कोणतीही माहिती देता येत नसल्याने पोलिसांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या तिन्ही मुलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने एका अनाथ आश्रमात ठेवण्यात आले आहे.

प्रकरणाची नोंद होताच विष्णूनगर पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजमध्ये संबंधित महिला सकाळी सुमारे नऊच्या सुमारास एका बंद दुकानासमोर मुलांसह थांबलेली दिसून आली आहे. ती वारंवार मोबाईल पाहत असल्याचेही आढळले. या आधारे पोलिसांनी महिलेचा फोटो मिळवून तो विविध पोलीस ठाण्यांकडे पाठवला आहे.

तथापि, पुढील मार्गावरील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने महिलेचा पुढील मागोवा घेणे कठीण झाले आहे. ही महिला नेमकी कोण आहे, ती कुठून आली होती आणि मुलांशी तिचा नेमका संबंध काय आहे, याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून नागरिकांनीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!