बारामतीत भैरवनाथ हॉटेलजवळ नेमकं काय घडलं? २६ वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला; दोन संशयितांचा शोध, ‘त्या’ जुन्या वादाची चर्चा

मोरगाव : बारामती तालुक्यातील कार्हाटी गावच्या हद्दीत शुक्रवारी (१८ सप्टेंबर) दुपारी घडलेल्या एका हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून एका २६ वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेत निलेश उर्फ अमोल सदाशिव जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर संशयित आरोपी दुचाकीवरून पसार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत.
मोरगाव-बारामती मार्गावरील कार्हाटी गावच्या हद्दीत दुपारी साडेएकच्या सुमारास हा प्रकार घडला. संजय जाधव यांच्या भैरवनाथ हॉटेलजवळील पत्र्याच्या शेडमध्ये अमोल जाधव यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून निघून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

या प्रकरणी द्वारका सदाशिव जाधव (वय ५४) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून ऋतिक बाळासो गिरमे (रा. कार्हाटी, ता. बारामती) आणि ओमप्रकाश हरिभाऊ भगत (रा. लोणी-पाटी, ता. बारामती) यांच्यावर हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे.


‘माती-मुरूम-वाळू’च्या व्यवहारातून वाद?
या हल्ल्यामागे माती, मुरूम आणि वाळू यांसारख्या गौण खनिजांच्या उत्खननाशी संबंधित जुना वाद असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. पोलिसांनीही या कारणाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. संशयित आरोपी ताब्यात आल्यानंतर हल्ल्यामागील नेमकी पार्श्वभूमी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांच्या शोधासाठी दोन पथके
हल्ल्यानंतर दोन्ही संशयित फरार असल्याने सुपा पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू असून संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांनी संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याची माहिती दिली. बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनीही हल्ल्याचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले. गौण खनिजांच्या उत्खननाशी संबंधित वादातून हा प्रकार झाल्याचे तपासात समोर आल्यास महसूल प्रशासनानेही या प्रकरणाची दखल घेऊन नियमानुसार कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कार्हाटी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून हल्ल्याचे नेमके कारण आणि फरार संशयित कधी पोलिसांच्या हाती लागतात, याकडे आता लक्ष लागले आहे.