प्रेम, अपयश आणि संशयाचा थरारक शेवट! नाशिकमध्ये लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून यवतमाळच्या तरुणाची आत्महत्या


नाशिक : प्रेमसंबंध, आर्थिक संकट आणि नात्यात आलेल्या दुराव्याचा अत्यंत धक्कादायक शेवट नाशिकमध्ये पाहायला मिळाला. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील २५ वर्षीय साहिल अशोक लाव्हारे याने आपल्या माजी लिव्ह-इन पार्टनर वैष्णवी आवारे (२०) हिची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर काही अंतरावर जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुहेरी मृत्यूमुळे नाशिकसह यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यातही हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, साहिल आणि वैष्णवी यांची तीन वर्षांपूर्वी पुण्यात नोकरीदरम्यान ओळख झाली होती. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर दोघांनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आणि उमरखेड येथे भाड्याच्या घरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. स्वतःचा संसार उभा करण्यासाठी दोघांनी व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. यावर्षी एप्रिलमध्ये साहिलने उमरखेडमधील ‘पाटीलवाडा’ नावाचे हॉटेल भाड्याने घेतले. मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने व्यवसाय तोट्यात गेला. वाढत्या आर्थिक अडचणींमुळे दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले आणि नात्यात दुरावा निर्माण झाला.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने वैष्णवीने साहिलपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि ती नाशिकला राहण्यासाठी गेली. काही दिवसांपासून साहिल तिला पुन्हा एकत्र येण्यासाठी विनवणी करत होता. चार दिवसांपूर्वी तो नाशिकला पोहोचला आणि इंदिरानगर परिसरात दोघांची भेट झाली. यावेळी त्याने पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र वैष्णवीने तो स्पष्टपणे नाकारला आणि तिचे गोपाळ वैरागी या तरुणासोबत लग्न ठरल्याची माहिती दिली.

ही बाब समोर येताच साहिलचा संताप अनावर झाला. त्याने जवळ असलेल्या चाकूने वैष्णवीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर साहिल तेथून निघाला आणि जवळील जॉगिंग ट्रॅकवर जाऊन झाडाला गळफास घेत स्वतःचे जीवन संपवले. काही वेळाने दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

तपासादरम्यान वैष्णवीच्या आयुष्याबाबतही काही बाबी समोर आल्या आहेत. लहानपणीच आई-वडिलांचे निधन झाल्याने तिचे संगोपन आजी-आजोबांनी केले होते. कठीण परिस्थितीत तिने स्वतःचे आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केला होता. साहिलसोबत संसार उभा करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही परिस्थिती बदलल्याने तिने वेगळा मार्ग स्वीकारला होता. मात्र तोच निर्णय तिच्या जीवावर बेतला.

दरम्यान, वैष्णवीचा होणारा पती गोपाळ वैरागी यांच्या तक्रारीवरून नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि दोघांमधील संवादाची माहिती तपासली जात असून, या दुहेरी मृत्यूमागील सर्व पैलूंचा सखोल तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!