विद्यानंद बापट यांना मारहाण होताच CM फडणवीसांचा मोठा निर्णय; तातडीने पोलिस संरक्षणाचे आदेश

पुणे : गणेशोत्सवातील लाऊडस्पीकर आणि डीजेला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर बापट यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.

हल्ल्यानंतर सरकारकडून तातडीने निर्णय
बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारकडून हालचाली सुरू झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना बापट यांना आवश्यक पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश दिले.


गणेश बिडकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे आता बापट यांच्यासोबत पोलिस संरक्षण असणार आहे.
दरम्यान, हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.