38 आठवडे गर्भवती असल्याचा दावा, सिझेरियन सुरू होताच डॉक्टरांना धक्का! पोटात बाळच नव्हतं; बनावट रिपोर्टचं रहस्य उघडलं


कराची : पाकिस्तानातील कराची येथील एका रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकाराने वैद्यकीय क्षेत्रासह सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे. एका महिलेने आपण 38 आठवड्यांची गर्भवती असल्याचे सांगत अल्ट्रासाऊंडचे रिपोर्ट रुग्णालयात दाखवले. रिपोर्टमध्येही गर्भधारणा झाल्याचे स्पष्टपणे नमूद असल्याने डॉक्टरांनी तिच्या प्रसूतीची तयारी केली. मात्र सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू केल्यानंतर महिलेच्या पोटात बाळच नसल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला 27 ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. तिने डॉक्टरांना अल्ट्रासाऊंड रिपोर्ट दाखवले होते. या रिपोर्टनुसार ती 38 आठवड्यांची गर्भवती होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली आणि इतर आवश्यक चाचण्याही केल्या. त्यानंतर प्रसूतीसाठी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र ऑपरेशन सुरू झाल्यानंतर डॉक्टरांना गर्भाशयात बाळच नसल्याचे आढळून आले. ही बाब कुटुंबीयांना कळताच त्यांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. महिलेची गर्भधारणा झाली होती, अल्ट्रासाऊंडमध्ये बाळही दिसत होते, मग रुग्णालयात आल्यानंतर बाळ अचानक कुठे गेले, असा सवाल कुटुंबीयांनी केला. त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर बाळ गायब केल्याचा गंभीर आरोप केला. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली.

यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात मात्र बाळ रुग्णालयातून गायब झाल्याचे नव्हे, तर संपूर्ण गर्भधारणेचीच कहाणी खोटी असल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला. संबंधित महिला प्रत्यक्षात गर्भवती नव्हती. लग्नाला जवळपास तीन वर्षे झाली होती आणि कुटुंबाकडून बाळासाठी तिच्यावर दबाव असल्याचे तपासात समोर आले. या दबावामुळे तिने आपण गर्भवती असल्याचे खोटे सांगितले आणि त्यासाठी बनावट अल्ट्रासाऊंड रिपोर्ट तयार केल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर रुग्णालयाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सिझेरियनसारखी मोठी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी गर्भाची स्थिती आणि बाळाच्या उपस्थितीची पुन्हा खात्री करण्यासाठी अल्ट्रासाऊंड करणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात महिलेने दाखवलेल्या अल्ट्रासाऊंड रिपोर्टच्या आधारेच पुढील वैद्यकीय तपासण्या आणि सिझेरियनचा निर्णय घेण्यात आल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

त्यामुळे बनावट रिपोर्ट तयार कसे झाले, त्यांची पडताळणी का झाली नाही आणि शस्त्रक्रियेपूर्वी पुन्हा अल्ट्रासाऊंड का करण्यात आला नाही, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील नेमकी जबाबदारी आणि बनावट रिपोर्टशी संबंधित बाबींचा तपास सुरू असून, घटनेने वैद्यकीय अहवालांच्या पडताळणीबाबतही मोठी चर्चा सुरू केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!