आश्चर्यम ! ‘यशवंत’ची वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीत संपन्न ; दिड दशकांत प्रथमच संचालक मंडळाच्या निर्णयांशी एकमत ; कारखाना सुरू करण्यासह सर्व विषयांंना चर्चेने मंजुरी …..

उरुळीकांचन : ‘यशवंत’च्या उर्वरीत ५० एकर जमिन विक्रीची कायदेशीर बाबींची पूर्तता पूर्ण करुन जमिन विक्रीचीपरवानगी घेणे तसेच शेतकरी व कामगार थकित देण्यांसाठी साखर आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करुन तज्ञ सभासद व कामगार वर्ग यांच्याशी समन्वय साधून थकित देणी देण्यासाठी निर्णय घेणे व कारखान्याचा योग्य क्षमतेचा आधुनिक प्लॅन्ट उभारून कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळाला बहुमताने पाठिंबा देण्याचा निर्णय होऊन विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान कारखान्याच्या गेली दिड दशकांच्या बंद अवस्थेतील कालखंडात प्रथमच वार्षिक सर्वसाधारणसभा ३ तास इतक्या प्रदिर्घ वेळेत चालवून सभासदांनी संचालक मंडळाला पाठबळ देण्याची कृती सभेत दिसून आली आहे.
सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील कला गोविंद कार्यालयात यशवंत सहकारी साखर कारखान्याची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि.२७)रोजी आयोजित करण्यात आली होती. कारखान्याच्या ४९.१८ एकर जमिनीच्या विक्रीनंतर सभेत काय घडणार म्हणून सभासदांना मोठी उत्सुकता लागली होती. मात्र सभेतसंचालक मंडळानी कारखाना सुरू करण्यासाठी अडीच वर्षात पुणे बाजार समितीशी घेतलेले निर्णय व या निर्णयांना सभासदांनी सूचना मांडून कारखाना सुरू करण्याच्या प्रयत्नांची उत्तरे जाणून घेतली. सुमारे तीन तास सभेत विषयपत्रिकांवर चर्चा होऊन सभासदांनी विषयांना मंजुरी दिली आहे.

सभेत विषयपत्रिकेवरील सुरुवातीच्या विषयात सभासद राजेंद्र रतन चौधरी यांनी सन २०२४-२५ व १९२५-२६ या वर्षातील अर्थिक ताळेबंदात आर्थिक पत्रके दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत दोन वर्षाच्या अर्थिक पत्रकांत १५ कोटी रुपये रक्कम तफावत दाखवित असल्याचे सांगितले. त्यावर अध्यक्ष व संचालक यांनी कारखान्याकडे मागील दोन वर्षांची नफा-तोटा पत्रके अस्तित्वात नसल्याने व जुने नफातोटा पत्रक अद्यावत नसल्याने ही अर्थिक पत्रके दुरुस्ती करण्यात येतील असे अश्वासित केले.


त्यानंतर कारखान्याच्या भागभांडवल उभारणी व महसुली अंदाजपत्रकाची नोंद घेणे या विषयावर सभासद प्रशांत काळभोर यांनी सहभाग घेत कारखान्याने ४९.१८ एकर जमिनीची विक्री केलेली आहे.उर्वरित ५० एकर जमिनीची विक्री करुन २९९ कोटी इतकी रक्कम उभी राहणार आहे.त्यामुळे कारखान्याने १०० कोटी कर्जाचा प्रस्ताव कशासाठी ठेवला ?असा प्रश्न उपस्थित करुन कारखान्याने ९९.२७ एकर जमिन विक्री केल्यानंतर कारखान्याची मालमत्ता कर्जासाठी गहाण ठेऊ नये असा मुद्दा उपस्थित केला.
सभासद भरत कुंजीर व पांडुरंग काळे यांनी कारखाना बंद पडलेल्या सन २०१० -११ अर्थिक वर्षातील शेतकरी व कामगारांची थकीत देणी व्याजासहीत अदा करावी तसेच कारखान्याने तत्कालीन ऊस दरानुसार थकीत देणी अदा न करता व्याजाची रक्कम देऊन अदा करावी हा मुद्दा मांडला. यावर संचालक मंडळातील अध्यक्ष सुभाष जगताप, संचालक अमोल हरपळे, राहुल घुले, संतोष कांचन , किशोर उंद्रे यांनी सभासद यांना थकीत देण्यासाठी साखर आयुक्त सूचना व सभासदांच्या अपेक्षांचा आदर करीत थकीत बिले अदा करणार असल्याचे सांगितले.
सभेत सभासद महादेव कांचन, विलास कुंजीर, विठ्ठल काळभोर ,आप्पासाहेब पवार यांच्यासह सभासदांनी संचालक मंडळाला विषय पत्रिकेवर सूचना केल्या तर विकास लवांडे , राजेंद्र चौधरी ,पांडुरंग काळे यांनी आक्षेप नोंदविले आहेत. सभेत कारखान्याच्या उपाध्यक्षा रत्नाबाई काळभोर यांनी स्वागत प्रस्तावा वर मनोगत व्यक्त करुन सर्वांची मने जिंकली.
.. तर कारखाना चालू झाला असता -सुभाष जगताप
सभेचे अध्यक्ष या नात्याने कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी आक्रमक प्रस्ताविक केले. या प्रस्ताविकात जगताप यांनी कारखान्याला वेळोवेळी विरोधकांनी खिंडीत पकडण्याचे षंडयंत्र रचल्याचे सभेपुढे सांगितले.पुणे बाजार समिती वकारखाना यांच्या संकल्पनेतून कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न स्व .अजित पवार यांच्या प्रयत्नातून कसा पुढे गेला व या प्रयत्नांंना आडकाठी आणण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी श्री चिंतामणीला स्मरून सांगितले. स्व. अजित पवार प्रयत्नांमुळे कारखाना सुरू होण्यास बळ मिळाले मात्र त्यांच्या पश्चात सहकार्य मिळत नसल्याचे आवर्जुन सांगत या प्रश्नापासून राजकीय जोडे बाजूला ठेवा असे आवाहन त्यांनी केले.
जमिन विक्रीला समर्थनच
यशवंत कारखान्याची जमिन विक्रीची प्रक्रिया तब्बल दिड दशकानंतर पुणे बाजार समितीशी झाली आहे. या जमिन विक्री प्रक्रियेत संचालक मंडळाने मनमानी व भ्रष्ट कारभार केल्याचा तक्रारी काही सभासदांनी कृती समितीच्या माध्यमातून केल्या होत्या. या व्यवहाराच्या तक्रारी व भांडवल प्रसारमाध्यमांतून करण्यात आले होते. मात्र सभेत जमिन विक्री प्रक्रियेला पाठबळच मिळून सभासदांनी काही आक्षेपांना सभेत बोलण्यातून परावृत्त केल्याचा प्रकार घडला.