शरद पवार भाजपसोबत गेले तर काँग्रेसची ताकद घटणार? पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली मोठी भीती; सोनिया गांधींबाबतही केला महत्त्वाचा खुलासा!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या विषयावर केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसच्या राजकीय ताकदीवर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असताना अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही गटांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होत असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यातच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या विधानाने या चर्चेला आणखी बळ मिळाले. अजित पवार हयात असते, तर १२ फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले असते, असा दावा तटकरे यांनी केला होता.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या राजकीय घडामोडींवर भाष्य करत राष्ट्रवादीचे २० ते २२ आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, अजित पवार गटाने राऊत यांचा दावा फेटाळून लावत त्यांच्यावर टीकाही केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील राजकीय समीकरणांबाबत संभ्रम कायम आहे.

शरद पवार भाजपसोबत गेले तर काँग्रेसचं काय होणार?

याच पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाचे विधान केले. शरद पवार यांनी ६० वर्षांनंतर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर तो त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, शरद पवार असा निर्णय घेतील, असे आपल्याला वाटत नसल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
पवार यांचा पक्ष असल्याने अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचाच आहे. परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र आले आणि त्यानंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर विरोधी पक्षांची ताकद निश्चितच कमी होईल, अशी भीती चव्हाण यांनी व्यक्त केली. अशा परिस्थितीत देशात दोनच विचारधारा शिल्लक राहतील, असेही त्यांनी म्हटले.
सोनिया गांधींच्या निर्णयाचीही आठवण
या चर्चेदरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या प्रसंगाचाही उल्लेख केला. सोनिया गांधी यांनी एकदा अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीच्या आग्रहानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला, असे चव्हाण यांनी सांगितले.
राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांच्यावर पुन्हा इटलीला परतण्याचा दबाव होता. मात्र, त्यांनी भारतालाच आपली मायभूमी मानून येथेच राहण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी नमूद केले.
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असताना दुसरीकडे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केलेली ही चिंता महत्त्वाची मानली जात आहे. शरद पवार यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
