महाराष्ट्रात मोठी खळबळ! बड्या बँकेचा डेटा चोरीला, तब्बल 3.75 लाख रेकॉर्ड्स लीक; तुमचंही खातं आहे का?

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) आयटी यंत्रणेवर सायबर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील एसबीआयच्या ग्लोबल आयटी सेंटरमधील सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश करून तब्बल 3 लाख 75 हजार रेकॉर्ड्स चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर चोरी केलेला डेटा डार्क वेबवर प्रसारित केल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे बँकेच्या डिजिटल सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
सहा दिवसांत हजारो फाइल्सची चोरी

मिळालेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत हा सायबर हल्ला झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हॅकर्सनी एसबीआयच्या YONO 2.0 आणि RAAS या महत्त्वाच्या ॲप्लिकेशन्सशी संबंधित डेटा चोरल्याचा आरोप आहे.

यामध्ये 32 CSV फाइल्स, दोन JSON फाइल्स आणि तब्बल 2 हजार 721 PDF फाइल्सचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण 3 लाख 75 हजार रेकॉर्ड्स चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
डार्क वेबवर डेटा प्रसारित केल्याचा आरोप
या सायबर हल्ल्यानंतर चोरी करण्यात आलेला डेटा डार्क वेबवर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे एसबीआयच्या ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, चोरी झालेल्या रेकॉर्ड्समध्ये नेमकी कोणती माहिती होती आणि त्याचा ग्राहकांना काही फटका बसला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बेलापूर पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी एसबीआयच्या अधिकाऱ्याने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश कसा करण्यात आला आणि चोरी झालेला डेटा नेमका कुठे वापरण्यात आला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
SBI ग्राहकांची चिंता वाढली
देशभरात कोट्यवधी ग्राहक असलेल्या एसबीआयच्या आयटी यंत्रणेवरच सायबर हल्ला झाल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. ग्राहकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित आहे का, तसेच चोरी झालेल्या डेटाचा गैरवापर होण्याची शक्यता आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांच्या तपासातून या संपूर्ण प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
