‘आईची जागा कोणी घेऊ शकत नाही!’ वडिलांनीच आईचा जीव घेतला, दोन चिमुरड्यांसमोर घडला थरकाप उडवणारा प्रकार; लेकीने सांगितला हत्येचा संपूर्ण घटनाक्रम!

जमालपूर : ज्या वडिलांच्या हाताला धरून दोन चिमुरड्या चालायला शिकल्या, त्याच वडिलांनी त्यांच्या आईचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे घडली आहे. पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतःच आपल्या दोन्ही मुलींना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आत्मसमर्पण केले. दशरथ मंडल असे आरोपीचे नाव असून ते रेल्वेचे निवृत्त कर्मचारी आहेत. पूजा देवी असे मृत पत्नीचे नाव आहे.

या प्रकरणात सर्वाधिक हादरवणारी बाब म्हणजे, अवघ्या दहा वर्षांच्या मुलीने आईच्या हत्येचा संपूर्ण प्रसंग डोळ्यांनी पाहिला. श्रीनिका असे या मुलीचे नाव आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ती आपली धाकटी बहीण इशिकासोबत झोपली होती. त्याचवेळी वडिलांनी आईला अंथरुणातून ओढून बाहेर काढले. त्यानंतर स्कार्फने बांधून तिच्याशी मारहाण केली आणि चाकूने दोन वेळा वार केले.
आईच्या किंकाळ्या ऐकून श्रीनिका जागी झाली. समोर आई जमिनीवर निपचित पडलेली पाहून ती घाबरली. तिने शेजाऱ्यांना बोलावून मदत घेण्याचा प्रयत्न केला; मात्र वडिलांनी तिला रोखले. त्यानंतर वडिलांनी जे शब्द उच्चारले, ते ऐकून चिमुरडीही सुन्न झाली.

‘आपण दुसरी आई आणू’; वडिलांच्या त्या वाक्यावर लेकीने दिलं उत्तर!

आईचा मृत्यू झाल्याचे सांगताना दशरथ मंडल यांनी मुलींना, ‘तुझी आई गेली, आपण दुसरी आई आणू,’ असे म्हटल्याचे श्रीनिकाने पोलिसांना सांगितले. मात्र, त्यावर या दहा वर्षांच्या मुलीने दिलेले उत्तर मन हेलावणारे आहे. ‘आई ही आईच असते. तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही,’ असे ती वडिलांना म्हणाली.
या घटनेनंतर श्रीनिकाने आपल्या वडिलांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आईला गमावण्याचे दुःख आणि स्वतःच्या वडिलांविरोधात उभे राहण्याची वेळ या चिमुरडीवर आली आहे.
आरोपीचे आत्मसमर्पण; पोलिसांकडून महत्त्वाचे पुरावे जप्त
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी दशरथ मंडल दोन्ही मुलींना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात गेले आणि स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. घटनास्थळी न्यायवैद्यक पथकाने तपासणी करून पुरावे गोळा केले. हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. पूजा देवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दरम्यान, पूजा देवी यांच्या माहेरच्या कुटुंबीयांना या घटनेचा मोठा धक्का बसला असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दोन निष्पाप मुलींसमोर घडलेल्या या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
