चालत्या बसमध्ये महिलेवर 2 तास सामूहिक अत्याचार; 7 किमीपर्यंत बस फिरली, निर्भया प्रकरणाची पुन्हा भीषण आठवण

दिल्ली : दिल्लीमध्ये पुन्हा एकदा निर्भया प्रकरणासारखीच धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 12 मे रोजी एका खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुले आहेत. घटनेनंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत बसचा चालक आणि कंडक्टर यांना अटक केली असून संबंधित बस जप्त करण्यात आली आहे.
पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यानंतर अधिकृतपणे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून बसची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास अधिक वेगाने सुरू आहे.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेला चालत्या बसमध्ये सुमारे 2 तास अत्याचार सहन करावा लागला. ही बस शहरातील विविध भागांत 7 किलोमीटरपर्यंत फिरल्याचेही समोर आले आहे. या संपूर्ण घटनेमुळे 2012 च्या निर्भया प्रकरणाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.

पोलिसांनी सांगितले आहे की, या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी सुरू आहे. बसमध्ये आणखी कोण उपस्थित होते का, तसेच या घटनेमागे कोणता कट होता का याचा शोध घेतला जात आहे. तांत्रिक पुरावे, जबाब आणि फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, या घटनेवर राजकीय व सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी याला अत्यंत गंभीर गुन्हा म्हणत कठोर कारवाईची मागणी केली आहे. दिल्लीतील महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की तपास पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.