सणासुदीच्या खरेदीआधीच ग्राहकांना झटका! एसी, टीव्ही, वॉशिंग मशीन महागणार; १ ऑक्टोबरपासून नवे दर लागू होण्याची शक्यता

पुणे : दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरासाठी नवीन एसी, टीव्ही, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन घेण्याचा विचार करत असाल, तर खरेदीचं नियोजन लवकर करावं लागू शकतं. कारण १ ऑक्टोबर २०२६ पासून ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षात इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून होणारी ही तिसरी दरवाढ ठरणार आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च आणि रुपयाच्या तुलनेत डॉलरमधील चढ-उतार यामुळे कंपन्यांवर उत्पादन खर्चाचा दबाव वाढला आहे.
एसीच्या किमतीत ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ

एसीच्या किमतीमध्ये साधारण ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. तर वॉशिंग मशीन, फ्रीज आणि एलईडी टीव्हीच्या किमती ३ ते ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. काही कंपन्यांनी विविध उत्पादनांच्या किमती याआधीच वाढवल्या असून, आणखी दरवाढीचा आढावा घेतला जात आहे.


ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डाइकिन आणि सुपर प्लास्ट्रोनिक्स यांसारख्या कंपन्यांनी विविध श्रेणींमध्ये दरवाढ केली आहे. एलजी आणि हिताची ब्रँडचे एसी विकणाऱ्या बॉश होम कम्फर्टने एसीच्या किमतीत सुमारे ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. तर पॅनासोनिककडून सध्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
तांबे, स्टील आणि प्लास्टिक महागल्याचा परिणाम
दरवाढीमागे तांबे, ॲल्युमिनियम, स्टील आणि प्लास्टिकसह विविध कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती हे प्रमुख कारण असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. कच्च्या तेलाशी संबंधित उत्पादनांच्या किमती आणि मालवाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यातच रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने आयात होणाऱ्या घटकांचा खर्च वाढत आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचाही पुरवठा साखळी आणि खर्चावर परिणाम होत असल्याचे उद्योगातील कंपन्यांनी नमूद केले आहे.
ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांच्या म्हणण्यानुसार, तांबे, स्टील आणि प्लास्टिकसह अनेक कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. कंपनीने यंदा आतापर्यंत तीन वेळा दरवाढ केली आहे. उत्पादन खर्चात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.
डायकिनकडून आधीच दरवाढ
डायकिन एअर कंडिशनिंग इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कंवलजीत जावा यांनी कंपनीने १६ सप्टेंबरपासून किमतीत ८ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याचे सांगितले. त्यांच्या मते, तांब्याच्या किमतीत सुमारे २५ ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली असून, डॉलर मजबूत झाल्याने खर्चाचा दबाव आणखी वाढला आहे.
सुपर प्लास्ट्रॉनिक्सकडून ऑक्टोबरनंतर टीव्हीच्या किमतीत सुमारे ७ टक्क्यांनी वाढ करण्याची योजना आहे. कंपनीने इतर घरगुती उपकरणांच्या किमतीत यापूर्वीच ४ ते ५ टक्क्यांनी वाढ केली आहे.
दिवाळीच्या खरेदीवर काय परिणाम होणार?
दरवाढीचा थेट परिणाम दसरा-दिवाळीच्या खरेदीवर होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या ग्राहकांना विविध सवलती आणि आकर्षक योजना देतात. त्यामुळे वाढलेल्या किमतींचा ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. मात्र, कंपन्या आणि विक्रेत्यांकडे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जुन्या दराने खरेदी केलेला मालसाठा उपलब्ध असल्याने काही उपकरणे दिवाळीपर्यंत जुन्या किमतीत मिळण्याची शक्यता आहे.