शिंदेंच्या शिवसेनेत नेमकं चाललंय काय? आधी जालना, आता परभणीतही नाराजीचा स्फोट; दोन नगरसेवक थेट सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर!


परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीत मोठी राजकीय खेळी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही नगरसेवक लवकरच आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गटाला मित्रपक्षाकडूनच धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे.

पाथरी नगरपरिषदेतील आलम तरन्नून बेगम मुजीब आणि पठाण हसीब खान तहजीब खान यांनी हा निर्णय घेतला आहे. हे दोघेही प्रभाग क्रमांक ७ ब मधून निवडून आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नगरसेवकपदाचे राजीनामे सादर केले. नगराध्यक्ष आसिफ खान यांच्या कारभारावर नाराजी आणि पक्षातील अंतर्गत मतभेदांना कंटाळून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. राजीनाम्यानंतर आपण यापुढे शिंदे गटाचे सदस्य म्हणून काम करणार नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.

पाथरी नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह शिंदे गटाचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी दोन जणांनी अचानक राजीनामा दिल्याने स्थानिक पातळीवरील पक्षीय ताकदीला धक्का बसला आहे. आता या दोघांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यास आमदार राजेश विटेकर यांच्या गटाला बळ मिळू शकते. त्यामुळे या पक्षप्रवेशाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजीची चर्चा याआधी जालन्यातही समोर आली होती. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या जालना दौऱ्यापूर्वी मंठा परिसरातील तालुका प्रमुखासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला होता.

आता जालन्यानंतर परभणीतही दोन नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने शिंदे गटातील स्थानिक मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत राजकीय हालचाली सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटातील नगरसेवक राष्ट्रवादीच्या दिशेने जात असल्याने परभणीतील आगामी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. suनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत या दोघांचा प्रवेश झाल्यानंतर शिंदे गटाची पुढील रणनीती काय असेल, याकडे आता लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!