बालरंगभूमी परिषदेकडून पुण्यात ‘जल्लोष लोककलेचा स्पर्धे’चे आयोजन ; शेकडो बालकलाकारांसाठी मेजवानी ….


पुणे : बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ ही स्पर्धा बुधवारी (दि. ३०) पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राष्ट्रसेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक भवन येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी होणार असून, ते आपल्या कलागुणांचे प्रदर्शन तेथे करणार आहेत.

बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. ख्यातनाम लावणी सम्राज्ञी वर्षाताई संगमनेरकर, ज्येष्ठ वादक संतोष मोरे आणि तरुण पिढीतील गायिका अस्मिता चिंचाळकर हे यास्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. यानंतर लगेच प्रावीण्य मिळवलेल्या कलाकारांना पुणे जिल्हा शाखेतर्फे बक्षीस वाटप केलं जाणार आहे. ग्रामीण आणि शहर अशा दोन्ही विभागातील बालकलाकार गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावणार आहेत. बुधवारची प्राथमिक फेरी पुणे येथे झाल्यानंतर २ आणि ३ ऑक्टोबर रोजी लातूर येथे या स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली असून, महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यातील कलाकार त्यामध्ये सादरीकरण करणार आहेत .

या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी बालरंगभूमी परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षा दीपाली शेळके, उपाध्यक्ष नारायण करपे, अरुण पटवर्धन, कोषाध्यक्ष शंकरराव घोरपडे, मुख्य सचिव प्रकाश खोत, तसेच विजयकुमार तांबे, संजय तांबे, नामदेव पडदुने ही सर्व कार्यकारी मंडळी प्रयत्न करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!