माळेगावमध्ये वारं फिरलं!! दुसरी फेरी सुरू होताच चंद्रराव तावरे यांचे 4 उमेदवार आघाडीवर, थांबलेली मतमोजणी पुन्हा सुरू….

बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतदानाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यामध्ये आता अनेक घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सतरा उमेदवार आघाडीवर आहेत. तब्बल २४ तासानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणीची एक फेरी संपली आहे.
पहिल्या फेरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सतरा उमेदवार आघाडीवर असून चंद्रराव तावरे यांच्या गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत. यामुळे अजूनही मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अजूनही अनेक गोष्टी घडू शकतात. असे बोलले जात आहे.
यामध्ये चंद्रराव तावरे यांच्या पॅनल मधून चंद्रराव तावरे व रणजीत खलाटे सांगवी गटातून वीरसिंह गवारे बारामती गटातून व राजश्री कोकरे महिला राखीव मतदार संघातून आघाडीवर आहेत. आता दुसऱ्या फेरीमध्ये काय होणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या थांबलेली मतमोजणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः बारामतीत तळ ठोकून जोरदार प्रचार केला. त्यांनी स्वतः ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करून सर्वांनाच धक्का दिला होता. त्यातच मीच चेअरमन होणार अशी घोषणा केल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली. यामुळे निवडणूक राज्यात गाजली.
दरम्यान, ब वर्गातून अजितदादांना ९१ इतकी मते मिळाली. तर भालचंद्र बापूराव देवकाते यांना १० मते मिळाली. अपेक्षेनुसार अजितदादांनी ब वर्गातून विजय मिळवला आहे. आजच्या मतमोजणीत निळकंठेश्वर पॅनलची विजयी सुरुवात झाली असून पुढे काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ही निवडणूक एकतर्फी झाली नाही.