IPL 2026 Playoffs: अंतिम सामना अहमदाबादमध्येच; धर्मशाला-न्यू चंदीगडमध्ये रंगणार प्लेऑफचा थरार


नवी दिल्ली : आयपीएलच्या १९ व्या हंगामातील प्लेऑफ सामने आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. यंदा प्लेऑफचे सामने अहमदाबाद, न्यू चंदीगड आणि धर्मशाला या तीन ठिकाणी खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

परंपरेनुसार अंतिम सामना विजेत्या संघाच्या होमग्राऊंडवर, म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होण्याची शक्यता होती. मात्र, मागील वर्षी बंगळुरूमध्ये झालेल्या विजयानंतरच्या रोड शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत काही जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने अंतिम सामना अहमदाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही २०२२, २०२३ आणि २०२५ मध्ये अहमदाबादने अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवले आहे.

यंदाच्या प्लेऑफमध्ये पहिल्यांदाच धर्मशालाला संधी मिळाली आहे. २६ मे रोजी क्वालिफायर-१ सामना धर्मशालातील एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात गुणतालिकेतील अव्वल दोन संघ आमनेसामने येतील. विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.

२७ मे रोजी न्यू चंदीगडमधील न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर एलिमिनेटर सामना रंगणार असून, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये लढत होईल. या सामन्यातील विजेता संघ २९ मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर-२ मध्ये क्वालिफायर-१ मधील पराभूत संघाशी भिडेल. हा सामना देखील न्यू चंदीगडमध्येच होणार आहे.

बीसीसीआयने स्पष्ट केले की, लॉजिस्टिक्स आणि व्यवस्थापनाच्या कारणांमुळे सामने तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. यामुळे चाहत्यांना विविध ठिकाणी सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.

अंतिम सामना ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून, याच सामन्यात आयपीएल २०२६ चा विजेता संघ निश्चित होईल.

प्लेऑफ वेळापत्रक:

क्वालिफायर-१ : २६ मे – धर्मशाला

एलिमिनेटर : २७ मे – न्यू चंदीगड

क्वालिफायर-२ : २९ मे – न्यू चंदीगड

अंतिम सामना : ३१ मे – अहमदाबाद

क्रिकेट चाहत्यांसाठी आता प्लेऑफचा थरार रंगण्यास सज्ज झाला असून, कोणता संघ अंतिम फेरी गाठतो आणि विजेतेपदावर नाव कोरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!