कदमवाकवस्तीमध्ये रात्रीच्या ‘ऑल आऊट’ मोहिमेत कारवाई! रिक्षातून फिरणारे दोघे कोयत्यांसह जेरबंद

लोणी काळभोर : पोलिसांच्या ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन संशयितांना धारदार शस्त्रांसह अटक केली आहे. ही कारवाई कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील घोरपडे वस्ती परिसरात रात्री ११ ते पहाटे २ दरम्यान करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या माहितीनुसार, गणेश रघुनाथ बनसोडे (वय २१) आणि अभिजीत दिलीप खर्चे (वय १८) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार अशोक गिरी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
पोलिसांचे विशेष पथक नियमित गस्त घालत असताना घोरपडे वस्ती परिसरात दोन जण रिक्षामध्ये बसून हातात कोयते घेऊन संशयास्पद हालचाली करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.

पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेढा घालून त्यांना पकडले. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातील रिक्षातून दोन लोखंडी कोयते आणि एक धारदार शस्त्र जप्त करण्यात आले. तसेच बजाज मॅक्सिमा रिक्षाही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी करण्यात येत आहे.
