आता डान्सबारमधील ‘छमछम’ थांबणार? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील डान्सबारवर अधिक प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार आणखी कडक पावले उचलणार आहे. डान्सबार प्रतिबंधक कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत काही बारचालकांनी इतर परवान्यांच्या आधारे व्यवसाय सुरू ठेवल्याचे सरकारच्या निदर्शनास आले असून, त्याला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, मनोरंजनाच्या नावाखाली परवाना घेऊन प्रत्यक्षात डान्सबार चालवणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन तरतुदी करण्यात येतील. यासंदर्भातील विधेयक चालू अधिवेशनात मंजुरीसाठी सादर करण्याचा सरकारचा मानस आहे.
तसेच, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूदही नव्या कायद्यात करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भातील मूळ प्रश्न आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. त्यावर अजय चौधरी, रईस शेख आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

ठाणे जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारच्या मुद्द्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या डान्सबार नियमन कायद्यानुसार ठाण्यातील कोणत्याही डान्सबारला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, काही बारचालकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३३ अंतर्गत सार्वजनिक मनोरंजन परवाना घेऊन ऑर्केस्ट्रा बार सुरू केले आहेत.
सरकारच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर आता अशा पळवाटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात बार सुरू करण्यासाठी आवश्यक परवानगी ही डान्सबार नियमन कायद्याअंतर्गतच घ्यावी लागेल. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत डान्सबारसदृश व्यवसायाला परवानगी दिली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तसेच, नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या बारचालकांविरोधात कठोर कारवाई करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूदही नव्या कायद्यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.