सुप्रिया सुळे थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर? शरद पवारांच्या मनात नेमकं काय; भाजपसोबतच्या चर्चेत मोठी अट ठेवणार?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता एका नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगू लागली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यास कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकतात, असा दावा ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तातून करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला आता मुख्यमंत्रीपदाचा नवा पदर जोडला गेला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा विषय सध्या चर्चेतून काहीसा मागे पडला असला, तरी त्यावर पडदा पडलेला नाही. पवार एनडीएमध्ये सहभागी होण्यास तयार झाल्यास भाजपकडून मोठ्या राजकीय सवलतींची अपेक्षा ठेवू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केवळ सत्ताधारी आघाडीत सहभागी होण्याऐवजी पक्षाच्या भविष्यासाठी महत्त्वाची राजकीय जबाबदारी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. त्याच उदाहरणाचा आधार घेत पवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकतात, अशी शक्यता या वृत्तात मांडण्यात आली आहे.

दरम्यान, दिवाळीच्या काळात भाजपच्या राज्यातील काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याचंही वृत्तात नमूद आहे. मात्र, या भेटींमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत किंवा एनडीएत प्रवेशाबाबत पवारांनी कोणतेही स्पष्ट संकेत दिले नसल्याचं सांगण्यात आलं आहे. पवारांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी थेट चर्चा करायची असू शकते, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भाजपला पवारांच्या पाठिंब्याची गरज का?

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयकांना मंजुरी मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. या विधेयकांसाठी आवश्यक दोनतृतीयांश बहुमताचं गणित जुळवताना भाजपला पवारांच्या गटाची मदत महत्त्वाची ठरू शकते.
वृत्तानुसार, लोकसभेत एनडीएकडे ३२० खासदार असून दोनतृतीयांश बहुमतासाठी ३६० खासदारांची आवश्यकता आहे. शरद पवारांच्या गटाकडे लोकसभेत आठ, तर राज्यसभेत एक खासदार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. हे संख्याबळ एनडीएसोबत आल्यास सरकारला संसदीय गणितात फायदा होऊ शकतो. मात्र, सुप्रिया सुळे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी, राष्ट्रवादीचं विलिनीकरण किंवा एनडीए प्रवेश याबाबत शरद पवार अथवा भाजपकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या ही राजकीय शक्यता आणि माध्यमांतील वृत्तावर आधारित चर्चा आहे. पवारांची पुढील भूमिका काय असणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
