पुणे रिंग रोडच्या कामाचा वेग वाढणार? राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पाहणी; MSRDC ला कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना


पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा प्रकल्प ठरलेल्या कालमर्यादेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) दिले आहेत. समितीचे प्रमुख आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पाची पाहणी आणि आढावा बैठक घेण्यात आली.

१६९ किलोमीटरचा रिंग रोड उभारला जाणार
पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि अहिल्यानगर, सातारा तसेच कोकणाकडे जाणारी अवजड वाहतूक यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने १४ जुलै २०१५ रोजी पुणे रिंग रोड प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली होती.

सुमारे १६९ किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड पश्चिम, पूर्व आणि पूर्व विस्तारित अशा तीन भागांत विकसित केला जात आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ५२ हजार ७८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाची रुंदी ११० मीटर असून डिझाइन वेग ताशी १२० किलोमीटर ठेवण्यात आला आहे. प्रकल्पात १६ इंटरचेंज, १४ बोगदे, ३६ व्हायाडक्ट, १८ मोठे पूल आणि ४५ लहान पुलांचा समावेश आहे.

तीन पॅकेजमधील कामांची प्रगती किती?
सार्वजनिक उपक्रम समितीने पश्चिम भागातील W3, W4 आणि W5 या पॅकेजमधील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. २० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची कामांची प्रगती

पुढीलप्रमाणे आहे.
– W3 पॅकेज: ४१.६२ टक्के काम पूर्ण
– W4 पॅकेज: ४३.६९ टक्के काम पूर्ण
– W5 पॅकेज: ४३.९९ टक्के काम पूर्ण
W3 आणि W4 मध्ये बोगद्यांचे खोदकाम व अस्तरीकरण सुरू आहे. तर W5 मध्ये पूल, व्हायाडक्ट आणि रस्त्याची कामे प्रगतिपथावर आहेत.

भूसंपादनासाठी ९ हजार कोटींपेक्षा अधिक मोबदला वितरित
या प्रकल्पासाठी सुमारे १ हजार ८६१ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. मावळ, मुळशी, हवेली, भोर, खेड आणि पुरंदर तालुक्यांतील ८२ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यासाठी सुमारे ९ हजार ३६८ कोटी रुपयांचा मोबदला जाहीर करण्यात आला असून, २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ९ हजार ६१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित मोबदल्याचे वितरण सुरू आहे.

शेतकऱ्यांना मोबदला देण्याच्या सूचना
आढावा बैठकीत समितीने भूसंपादन, पर्यावरण आणि वन विभागाच्या मान्यता, रेल्वे उड्डाणपूल तसेच निधीच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचा उर्वरित मोबदला तातडीने वितरित करावा, स्थानिक नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी आणि प्रलंबित परवानग्या लवकर मिळवाव्यात, अशा सूचना समितीने दिल्या.

पुणे रिंग रोडमुळे शहराबाहेरील अवजड वाहतूक बाहेरून वळवता येणार आहे. परिणामी वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच प्रवासाचा वेळ, इंधन आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी समिती सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!