वाघोली गृहप्रकल्पांत ‘खराडी एनएक्स’ आणि ‘अप्पर खराडी’ असा उल्लेख; दिशाभूल करणाऱ्या जाहिराती खपवून घेणार नाही; आमदार ज्ञानेश्वर कटकेंचा बिल्डरांना इशारा…

पुणे : वाघोलीतील गृहप्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये ‘खराडी एनएक्स’ आणि ‘अप्पर खराडी’ अशा नावांचा वापर करून घर खरेदीदारांची दिशाभूल केली जात असल्याचा मुद्दा आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी उपस्थित केला आहे.
संबंधित विकासकांनी जाहिराती, होर्डिंग्ज आणि प्रकल्पाच्या कागदपत्रांमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करावा, तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

वाघोली परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभारले जात असून, काही विकासक सोशल मीडिया, होर्डिंग्ज आणि डिजिटल माध्यमांवरील जाहिरातींमध्ये प्रकल्पाचे मूळ ठिकाण न दर्शवता ‘खराडी एनएक्स’ किंवा ‘अप्पर खराडी’ अशा नावांचा वापर करत असल्याचे कटके यांनी निदर्शनास आणून दिले. प्रत्यक्ष प्रकल्प वाघोली परिसरात असताना जाहिरातींमधून वेगळे भौगोलिक चित्र उभे केले जात असल्याने घर खरेदीदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

घर खरेदीसाठी नागरिक लाखो-कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. त्यामुळे प्रकल्पाचे नेमके ठिकाण, पत्ता आणि प्रशासकीय हद्द यांची स्पष्ट व पारदर्शक माहिती देणे विकासकांची जबाबदारी आहे. केवळ व्यावसायिक फायदा मिळवण्यासाठी आकर्षक नावांचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करणे योग्य नसल्याचे कटके यांनी स्पष्ट केले.

जाहिराती आणि कागदपत्रांमध्ये वाघोलीचा स्पष्ट उल्लेख हवा
संबंधित गृहप्रकल्पांचे पिनकोड, महसूल नोंदी आणि प्रशासकीय तपशील वाघोलीशी संबंधित असताना जाहिरातींमध्ये अन्य नावांचा वापर होत असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित विकासकांना प्रकल्पांच्या जाहिराती, होर्डिंग्ज आणि सर्व कागदपत्रांमध्ये अधिकृत ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या विकासकांची तपासणी करून नियमांनुसार कठोर कारवाई करावी, घर खरेदीदारांची संभाव्य फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकरणातील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, अशी मागणी आमदार माऊली कटके यांनी केली आहे.
