राज ठाकरे यांची भेट कशासाठी घेतली, राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सगळंच सांगितलं..

मुंबई : आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी दाखल झाले. यामुळे भेट नेमकं कशासाठी याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. चर्चा फक्त तुम्ही करता, ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. यावेळी कोणती राजकीय चर्चा झाली नाही.

मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं, मी घरी येईन. त्यामुळेच आज मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांना भेटून गप्पा मारल्या, नाश्ता केला. आणि मग तिथून मी निघालो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तसेच आमच्या या भेटीचा किंवा बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. याबाबत मात्र राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. या शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण १२ जागांपैकी ५ जागा रिक्त आहेत. यामुळे अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.

भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरेंना घेतलं जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं भाजप काही जागा मनसेला सोडू शकतं, अशी माहिती आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत माहिती समोर येईल.