दगलबाज मान्सूनने वाढवलं टेन्शन! पाऊस जुलैपर्यंत लांबणार? उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी

मुंबई : राज्यातील नागरिक आणि शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, मान्सूनची वाटचाल पुन्हा एकदा मंदावल्याने पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेषतः विदर्भासह राज्यातील काही भागांमध्ये मान्सून जुलैच्या सुरुवातीपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या अनुकूल वातावरण नसल्याने त्याची गती कमी झाली आहे. त्यामुळे विदर्भात मान्सून 25 जून ते 1 जुलैदरम्यान दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस विदर्भासह अनेक भागांत उष्णतेची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असून नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो.

मान्सूनच्या विलंबामुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळेत पाऊस न झाल्यास पेरण्या लांबण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनीही पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अल निनोच्या प्रभावामुळे भविष्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.