अभिजीत दीपकेंच्या भेटीने महायुतीत ‘धुसफूस’? शिरसाट-बच्चू कडूंना शिंदेंचा जाब, राजकीय पडद्यामागे हालचालींना वेग


मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदारांनी घेतल्याने महायुतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दीपके यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनीही दीपके यांची भेट घेतली. या भेटींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

अभिजीत दीपके यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जवळपास महिनाभर आंदोलन केले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. 20 जुलै रोजी आंदोलकांनी संसद भवनावर मोर्चा काढल्यानंतर हे आंदोलन देशभर चर्चेचा विषय बनले. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

या घडामोडीनंतर अभिजीत दीपके यांची राजकीय नेत्यांकडून भेट घेण्यास सुरुवात झाली. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दीपके यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर दीपके स्वतः घरी परतल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली. या दोन्ही भेटींमुळे महायुतीतील काही नेत्यांमध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना या भेटीबाबत विचारणा केली. महायुतीची भूमिका निश्चित झालेली नसताना अशा प्रकारे स्वतंत्रपणे भेट घेणे योग्य नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे. कोणत्याही राजकीय विषयावर भूमिका घेताना आघाडीतील समन्वय आणि पक्षाची भूमिका लक्षात घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महायुतीमध्ये गैरसमज निर्माण होतील, असे कोणतेही पाऊल नेत्यांनी टाळावे, असे म्हटले आहे. त्यामुळे या भेटींवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्येही चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.

अभिजीत दीपके यांच्या आंदोलनानंतर त्यांच्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे त्यांची चर्चा होत असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या भेटींमुळे नव्या समीकरणांच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आता या भेटींवर महायुतीकडून पुढील काळात कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!