प्रेमाच्या जाळ्यातून गुप्त माहिती चोरण्याचा कट? जैश-ए-मोहम्मद कनेक्शनने खळबळ, हनी ट्रॅप प्रकरणात अर्पिता सरकार अटकेत

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय नेते आणि व्हीआयपी व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचा कट रचला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात स्पेशल टास्क फोर्सने (STF) जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संशयित ऑपरेटिव्ह मोहम्मद हामिम मंडल याच्या कथित सहकारी अर्पिता सरकार हिला अटक केली आहे.
तपासानुसार, एसटीएफने काही दिवसांपूर्वी बर्धमान शहरातील एका भाड्याच्या घरातून मोहम्मद हामिम मंडल याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरली आणि अर्पिता सरकारपर्यंत पोहोचली. अर्पिताला झारखंडमधील साहिबगंज येथून अटक करून पश्चिम बंगालमध्ये आणण्यात आले आहे. न्यायालयाने तिला 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तिची कसून चौकशी सुरू आहे.

तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, या नेटवर्कचा उद्देश केवळ संपर्क वाढवणे नव्हता, तर प्रभावशाली व्यक्तींकडून महत्त्वाची आणि गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता का, याचा तपास सुरू आहे. अर्पिता सरकार आणि मोहम्मद हामिम मंडल यांच्यातील व्हॉट्सॲप संभाषण, डिजिटल चॅट आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे एसटीएफने ताब्यात घेतले असून त्यांची तपासणी केली जात आहे.


प्राथमिक तपासात मोहम्मद हामिम मंडल हा कथितरित्या दहशतवादी नेटवर्कशी जोडलेला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील काही राजकीय नेते, मोठ्या व्यक्ती आणि संभाव्य लक्ष्यांची माहिती गोळा करण्याचे काम त्याच्याकडे होते का, याचा शोध घेतला जात आहे. तसेच या नेटवर्कमध्ये आणखी किती लोक सहभागी आहेत, याची माहिती मिळवण्यासाठी तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पश्चिम बंगालमधील वरिष्ठ नेत्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा चर्चेत आला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगितले. संशयितांचे आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नसून, त्यांच्या हालचाली आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या ताफ्यांवर नजर ठेवण्यात आली होती का, याचाही तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, हनी ट्रॅपच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेली माहिती भविष्यात कोणत्याही मोठ्या दहशतवादी कारवाईसाठी वापरण्याचा कट होता का, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. डिजिटल पुरावे, आरोपींचे संपर्क आणि संभाव्य सहकाऱ्यांची माहिती तपासल्यानंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.