PM किसानच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 23वा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून पीएम-किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी वितरित करण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2 हजार रुपये जमा होणार आहेत.

मात्र, या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांना हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे बियाणे, खते, औषधे आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर खर्चांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो.

याआधी 13 मार्च 2026 रोजी 22वा हप्ता जारी करण्यात आला होता. आता 23व्या हप्त्याची प्रतीक्षा असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी 20 जूनची तारीख महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. मोबाईलवर ओटीपीद्वारे पडताळणी, कॉमन सर्व्हिस सेंटर येथे बायोमेट्रिक पडताळणी किंवा फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करता येते.
तसेच, हप्ता जमा झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी लाभार्थी पीएम-किसान पोर्टलवरील “Beneficiary Status” पर्यायाचा वापर करून आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत तपशीलांच्या मदतीने माहिती पाहू शकतात.