लग्न एकासोबत आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं, पक्ष सोडायला 85 कोटी, राज्यात मोठा राजकीय भूकंप…

मुंबई : सध्या शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या सेनेत दाखल होणार असल्याची माहिती आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 6 खासदार हे शिंदे गटात दाखल होणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडीवर सध्या टीका केली जात आहे.

याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले,लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं. हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे.
याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील. एकेका खासदाराचा रेट ८५ कोटी..? रुपये दिल्याची माहिती देखील आहे. एवढे पैसे द्यायला संबंधित पक्षाकडं पैसे येतात तरी कुठून? असेही रोहित पवार म्हणाले.

शिवसेना, राष्ट्रवादी, आप, तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना. देशात हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस लोकंच रस्त्यावर उतरून पळून जाणाऱ्यांना आणि पळवून नेणाऱ्यांना चोपल्याशिवाय राहणार नाहीत, आमदार असेही रोहित पवार म्हणाले.

आज डोक्यावर दुष्काळाचं सावट आहे, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी नाही, मालाला भाव नाही, बेरोजगारी वाढलीय, नोकरभरतीचा बट्ट्याबोळ केलाय, मध्यमवर्गीयांना ईएमआय भरण्यासाठी पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीत सामान्य माणूस कधी नाही एवढा अडचणीत असताना यावर मात्र चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे. असेही ते म्हणाले.