नेपाळमध्ये एव्हरेस्टजवळ मोठी दुर्घटना; लँडिंगदरम्यान दोन हेलिकॉप्टरची धडक, भारतीय पर्यटकाचा मृत्यू तर तिघे जखमी…


नेपाळ : माउंट एव्हरेस्ट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या मार्गावरील फेरेचे हेलिपॅडवर उतरण्याच्या तयारीत असताना दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या अपघातात भारतातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून, न्यूझीलंडमधील नागरिकासह तिघे जखमी झाले आहेत. मंगळवारी (३ नोव्हेंबर) सकाळी सुमारे ८ वाजून ११ मिनिटांनी ही घटना घडली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिशटेल एअर आणि एअर डायनेस्टी या दोन खासगी कंपन्यांची हेलिकॉप्टर फेरेचे हेलिपॅडवर उतरत असताना एकमेकांच्या संपर्कात आली. या धडकेत हेलिकॉप्टरचे रोटर एकमेकांना आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. फिशटेल एअरचे हेलिकॉप्टर पर्यटकांना घेऊन जात होते, तर एअर डायनेस्टीचे हेलिकॉप्टर मालवाहतूक करत होते.

भारतीय पर्यटकाचा मृत्यू, न्यूझीलंडचा नागरिक जखमी

या अपघातात ४७ वर्षीय भारतीय पर्यटक वसंत कुमार बालारामरामाडू यांचा मृत्यू झाला. ते फिशटेल एअरच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. त्याच हेलिकॉप्टरमध्ये असलेले न्यूझीलंडमधील ४९ वर्षीय शैलेश कृष्ण पटेल हे जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने काठमांडू येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

या अपघातात दोन्ही हेलिकॉप्टरचे वैमानिकही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनाही उपचारासाठी काठमांडू येथे नेण्यात आले आहे. मृत पर्यटकाचा मृतदेह लुक्ला येथील रुग्णालयात ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.

अपघाताचे नेमके कारण काय?

नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यातील फेरेचे परिसरात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टर उतरत असताना ही धडक झाली. अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाडाची शक्यता व्यक्त केली असली, तरी तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, नेपाळमध्ये सध्या ट्रेकिंगचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे एव्हरेस्ट बेस कॅम्प परिसरात पर्यटक आणि गिर्यारोहकांची मोठी वर्दळ असते. या भागात ट्रेकर्सना ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत घडलेल्या या अपघातामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!