कोण जिंकले, कोण पडले? पाच राज्यांच्या निवडणुकीचा पूर्ण निकाल एका क्लिकमध्ये..

बारामती : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह महाराष्ट्रातील दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती.

या निकालांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीसाठी मोठा राजकीय बूस्टर ठरला असून देशभरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विविध राज्यांमध्ये भाजपने आपली ताकद अधिक मजबूत करत आगामी निवडणुकांसाठी भक्कम पायाभरणी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपने तब्बल १९५ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला, तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला ९२ जागांवर समाधान मानावे लागले. आसाममध्येही भाजपने १०० जागा जिंकत सत्ता कायम राखली आहे.

केरळमध्ये मात्र मोठा राजकीय उलटफेर झाला असून काँग्रेसने १४० पैकी १०४ जागा जिंकत सत्ता स्थापनेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. डाव्या पक्षांना येथे मोठा धक्का बसला आहे.

तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाने १०६ जागा जिंकत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्यांनी द्रमुक आणि अण्णाद्रमुकसारख्या बलाढ्य पक्षांना मागे टाकत राज्याच्या राजकारणात नवा पर्याय निर्माण केला आहे.
पुद्दुचेरीमध्येही भाजपने २२ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांमध्ये महायुतीने विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी २,१८,९३० मतांच्या विक्रमी फरकाने ऐतिहासिक विजय मिळवत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला.
राहुरी मतदारसंघात भाजपचे अक्षय कर्डिले यांनी १,१२,५८७ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. मोकाटे यांना २७,५०६ मते मिळाली.
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांना ५,६९० तर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना ७,२९९ मते मिळाली. मोठ्या मताधिक्याने विजयी होत अक्षय कर्डिले आता विधानसभेत प्रवेश करणार आहेत.