पुणे- संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे नेमका अडकलाय कुठं? काय आहेत कारणे?

पुणे : पुणे – छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ची 2019 साली घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ही घोषणा केली. सध्याच्या पुणे – छत्रपती संभाजी नगर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने, या मार्गावर जड वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याने नवीन महामार्ग विकसित करण्याची घोषणा झाली.

आता या महामार्गाची घोषणा होऊन जवळपास चार वर्षे उलटली आहेत आणि प्रत्यक्षात अजूनही या महामार्ग प्रकल्पाबाबत काहीच हालचाल झालेली नाही. यामुळे हा महामार्ग प्रकल्प नेमका कुठे अडकला आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या स्थितीला पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना सहा तासांचा वेळ लागत आहे.
नवीन पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्ग विकसित झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी तीन तासांवर येण्याची शक्यता आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील असा आशावाद व्यक्त होतोय. नव्या महामार्गामुळे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे, कारण की सध्याच्या महामार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.

नव्या मार्गामुळे वेरूळ अजिंठा, दौलताबाद तसेच पुणे आणि नगर मधील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांच्या विकासाला यामुळे नवीन चालना मिळणार आहे. हा प्रकल्प रखडल्याची कारणे अनेक आहेत. या प्रकल्पाची फक्त घोषणा करण्यात आली आहे अजून या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आलेला नाही. तसेच जमिनीचे अधिग्रहण झालेले नाही.

या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारांमधील समन्वयाचा अभाव आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेषतः अहिल्यानगर आणि मराठवाड्याच्या प्रगतीसाठी या ग्रीनफिल्ड प्रकल्पाला तात्काळ गती देणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पासाठी राजकीय इच्छाशक्तीची कमतरता आहे. शिवाय स्थानिक शेतकऱ्यांचा जमिनीबाबतचा विरोध यामुळे हा प्रकल्प अनिश्चिततेत सापडला आहे.
दरम्यान, हा प्रकल्प औद्योगिक विकासासाठी गेम चेंजर ठरणार असल्याने या महामार्गासाठी स्थानिक जनतेसह उद्योजक, शेतकरी यांच्याकडून सातत्याने मागणी होत आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ची 2019 साली घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ही घोषणा केली होती.