मोठा राजकीय स्फोट! पार्थ पवार यांच्या विधानाने बारामतीत खळबळ…

बारामती : बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हायला हवी होती, मात्र काही लोकांनी जाणूनबुजून उमेदवार उभे करून वातावरण बदलले, असा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे. तरीही आम्ही निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

उन्हाच्या कडाक्यात मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उद्या होणाऱ्या सांगता सभेबाबतही पार्थ पवार यांनी भाष्य करत, ही सभा निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
पार्थ पवार यांनी बारामती निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य करत खळबळ उडवली आहे. अनेकांची इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, मात्र तसे झाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काही उमेदवारांच्या विविध मागण्या होत्या, तर काही प्रतिस्पर्ध्यांना मुद्दाम उभे करण्यात आले, असा गंभीर दावा त्यांनी केला.

पार्थ पवारांच्या या विधानामुळे बारामतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण अधिकच तापल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उद्या होणाऱ्या सांगता सभेच्या तयारीबाबत पार्थ पवार यांनी माहिती दिली. सभेच्या स्थळाची पाहणी सुरू असून, उद्या मोठ्या प्रमाणावर सभा पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील उष्णतेच्या पार्श्वभूमीवरही मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, रामदास आठवले यांच्यासह विविध पक्षांचे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
निवडणुकीला आम्ही पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहोत, असा विश्वास पार्थ पवार यांनी व्यक्त केला. प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणे हे मोठे आव्हान असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तरीही आम्ही चांगल्या मतांनी निश्चित विजयी होऊ, असा दावा करत त्यांनी पुढे म्हटले की, यावेळी केवळ विजयच नाही तर दोन लाख ७० हजार मतांच्या विक्रमालाही मागे टाकण्याचे आमचे लक्ष्य आहे.