मुंबईतील MHADA घरांसाठीची प्रतीक्षा संपणार; सोडतीचा कार्यक्रम अखेर कधी जाहीर होणार? जाणून घ्या..

मुंबई : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या 2,640 घरांच्या संगणकीय सोडतीचा अधिकृत कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून, गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षा करणाऱ्या हजारो अर्जदारांना अखेर दिलासा मिळणार आहे.

मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोडतीबाबतची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात केली जाणार आहे. त्यामुळे सोडतीची तारीख, वेळ आणि इतर तपशीलही लवकरच स्पष्ट होणार आहेत.
म्हाडाने 30 मार्च 2026 रोजी मुंबईतील 2,640 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. या योजनेसाठी 75,366 अर्ज प्राप्त झाले होते. सुरुवातीला 15 मे रोजी सोडत होणार होती. मात्र अपेक्षेपेक्षा कमी अर्ज आल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आणि नंतर सोडतीची तारीख 5 जून निश्चित करण्यात आली. त्यानंतरही मुदतवाढ देण्यात आली आणि विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोडत पुढे ढकलण्यात आली.

जुलै महिना अर्धा उलटल्यानंतरही कोणतीही घोषणा न झाल्याने अर्जदारांमध्ये नाराजी होती. मात्र आता ही प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसत आहेत.

या सोडतीत कन्नमवार नगर (विक्रोळी), पत्राचाळ सिद्धार्थ नगर (गोरेगाव), जुने मागाठाणे (बोरीवली), गोराई, सुभाष नगर (चेंबूर), गांधीनगर (वांद्रे), पंतनगर (घाटकोपर), गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर (दादर), पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल (वडाळा) येथील घरांचा समावेश आहे.
उत्पन्न गटानुसार 145 अत्यल्प उत्पन्न गट (EWS), 858 अल्प उत्पन्न गट (LIG), 798 मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि 839 उच्च उत्पन्न गट (HIG) अशा एकूण 2,640 सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
याशिवाय विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगरमधील 1,221 सदनिकांच्या किमतीत 7.5 टक्के कपात करण्यात आली असून, त्यापैकी 610 सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे अधिक नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर खरेदीची संधी मिळणार आहे.
सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ याबाबतची सविस्तर माहिती लवकरच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.