यंदा कधी आहे गुढीपाडवा? जाणून घ्या गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व..

पुणे : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषत: महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे.
यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा हा सण रविवारी, ३० मार्च रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो, यामुळे गुढीपाडवा हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो, शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व जाणून घेऊ…
यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी २९ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजून २७ मिनिटांनी सुरू होणार असून ती ३० मार्च दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार ३० मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल.
हिंदी दिनदर्शिकेनुसार, गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त ३० मार्च रोजी सकाळी ४ वाजून ४१ मिनिटांपासून ते सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत आहे.
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपासून ते ७ वाजेपर्यंत असेल.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही, तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजा करू शकता.
महाराष्ट्रभर ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात. मुंबई, पुणे, ठाणे यासह अनेक ठिकाणच्या शोभा यात्रा या नेहमी चर्चेचा विषय असतात. अनेक महाराष्ट्रीय तरुण, तरुणी या सणानिमित्ताने पारंपरिक मराठमोळ्या गेटअपमध्ये शोभा यात्रांमध्ये सहभागी होतात.