राजकारणातून बाजूला जातील ते शरद पवार कसले? पक्षाच्या वर्धापनदिनी केली मोठी घोषणा, कार्यकर्त्यांना थेट संदेश…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले. खतासाठी शेतकऱ्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून अनेक ठिकाणी खत मिळावे म्हणून शेतकरी रात्रभर दुकानांबाहेर थांबत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी सध्या मोठ्या संकटात असून कर्जबाजारीपणामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. गेल्या काही दिवसांतील शेतकरी आत्महत्यांच्या घटनांचाही त्यांनी उल्लेख केला. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत सत्ताधाऱ्यांना कळत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे सांगत समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला हा देश आपला वाटेल असा राज्यकारभार असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मात्र सध्याची परिस्थिती वेगळी असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, येत्या आठ ते दहा दिवसांत उपेक्षित समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गरज भासल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास संघर्ष करण्यासही पक्ष मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी शरद पवार यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणावरही भाष्य केले. जगभरात विविध संघर्ष सुरू असून इराणसह अनेक देश संकटांचा सामना करत असल्याचे त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्यायग्रस्त देशांच्या पाठीशी उभे राहणे ही भारताची परंपरा असल्याचे सांगत सध्याच्या परराष्ट्र धोरणाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आता थांबून चालणार नाही, कामाला लागावे लागेल, राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही, असे सांगत जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.