भाजपमध्ये काय सुरूय? आता पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा भाजपामध्ये प्रवेश
पुणे : पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. यामुळे भाजपवर टीका केली जात आहे.
यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक या वेळी उपस्थित होते. गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे.
स्वाती मोहोळ यांच्या माध्यमातून जो प्रवेश होत आहे, त्यामुळे कोथरुडमधील आजच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोथरुड मधील स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांचा आज भाजपामध्ये प्रवेश झाला असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे आज देशातील प्रत्येकाचा भाजपावर अढळ विश्वास आहे. या पक्षात गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य मिळते, असेही ते म्हणाले.