इस्रायल -इराण युद्धाची धग पेटणार! भारताने एलपीजी पुरवठ्यावर घेतला मोठा निर्णय..

मुंबई : गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या इस्त्राईल आणि इराण यांच्यात पेटलेल्या युद्धाची धग आता भारतापर्यंत येऊन पोहोचली आहे. या आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे कच्च्या तेलाची आणि गॅसच्या किमतीचा भडका उडणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना भारताने गॅस पुरवठा बाबत मोठा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता पश्चिम आशियातून होणाऱ्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे भारताने एलपीजी उत्पादन वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. भारतात 33 कोटीहून अधिक लोक एलपीजीचा वापर करतात. या पार्श्वभूमीवर सरकारने देशातील सर्व तेल रिफायनरी कंपन्यांना पेट्रोल गॅसचे उत्पादन शक्य तितके वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी आयात करणारा देश आहे.गेल्या वर्षी देशात सुमारे 33.15 दशलक्ष मेट्रिक टन एलपीजीचा वापर झाला होता.एकूण मागणी पैकी जवळपास दोन तृतीयाश एलपीजी आयातीवर अवलंबून आहे आणि त्यातील 85 ते 90% पुरवठा पश्चिम आशियातून होतो. मात्र या युद्धाची झळ सर्वसामान्यांना बसू नये म्हणून भारत ऍक्शन मोडवर आला आहे.

पश्चिम आशियातील पुरवठा कमी झाल्यामुळे सरकारने तेल कंपन्यांना उपलब्ध प्रोपेन आणि ब्युटेन संशोधनाचा जास्तीत जास्त वापर करून एलपीजी उत्पादनाला प्राधान्य देण्याच आदेश दिले आहेत. यामुळे एलपीजीची टंचाई निर्माण होऊ नये हा सरकारचा उद्देश आहे.
