दुसरं लग्न… तरी पहिल्या पतीशी संपर्क कायम; संशयाच्या भरात पतीकडून पत्नीचा भयावह शेवट

मुंबई : मुंबईतील ओशिवरा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. 25 वर्षीय पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. पहिल्या पतीशी संपर्क असल्याच्या संशयातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृत महिलेचे नाव शबरून नेला अन्सारी (25) असून, अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव सेराज अन्सारी आहे. दोघेही ओशिवरा येथील गुलशननगर परिसरातील रोस्वाल्ट इमारतीत राहत होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, शबरूनचा हा दुसरा विवाह होता. मात्र, लग्नानंतरही ती पहिल्या पतीच्या संपर्कात असल्याचा संशय सेराजला होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

सोमवारी रात्रीही पहिल्या पतीशी फोनवर बोलण्याच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात सेराजने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.


घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही तासांत आरोपी पतीला अटक करण्यात आली.
या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
